ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचं दहशतवादाविरोधातलं ठाम धोरण स्पष्ट झालं, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं केरळमधील समाजसुधारक श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातल्या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभात बोलत होते. दहशतवाद्यांची आश्रयस्थानं आता सुरक्षित नाहीत, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. आजच्या भारतात केवळ राष्ट्रहिताचे निर्णय घेतले जातात तसंच भारताचं इतर देशांवरचं लष्करी अवलंबित्व कमी होत आहे, देश संरक्षणदृष्ट्या स्वावलंबी होत आहे, हे प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
श्री नारायण गुरू यांची शिकवण देशातल्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, सरकार या दृष्टीने काम करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. नारायण गुरू यांच्याशी संबंधित तीर्थस्थळांना जोडण्यासाठी शिवगिरी सर्किटचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. श्री नारायण गुरू यांचे विचार देशाला मार्गदर्शन करत राहतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला.
महात्मा गांधी यांच्या नारायण गुरूंसोबतच्या भेटीदरम्यान १२ मार्च १९२५ रोजी शिवगिरी मठात हा ऐतिहासिक संवाद झाला आणि तो वायकोम सत्याग्रह, धर्मांतर, अहिंसा, अस्पृश्यता निर्मूलन, मोक्षप्राप्ती, दलितांचे उत्थान इत्यादींवर केंद्रित होता. भारताच्या सामाजिक आणि नैतिक रचनेला आकार देणाऱ्या दूरदर्शी संवादावर चिंतन करण्यासाठी आणि त्यांचं स्मरण करण्यासाठी या विशेष समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन, खासदार अदूर प्रकाश आणि शिवगिरी मठाचे साधू उपस्थित आहेत.