वंदे मातरम हे गीत आपली उर्जा आणि प्रेरणा बनावं, देश आत्मनिर्भर बनावा आणि २०४७मध्ये विकसित भारताचं स्वप्न पूर्ण व्हावं, या स्वप्नाचा पुनरुच्चार करण्याची संधी या गीताच्या दीडशेव्या वर्षपूर्तीने दिली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत वंदे मातरम गीतावरच्या चर्चेला सुरूवात करताना ते बोलत होते.
ज्या मंत्राने, जयघोषाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला उर्जा आणि प्रेरणा दिली होती, त्यागाचा आणि तपर्श्चयेचा मार्ग दाखवला होता, त्या वंदे मातरम गीताचं स्मरण करणं हे आपलं सौभाग्य आहे. या गीताच्या दीडशेव्या वर्षपूर्तीचे आपण साक्षीदार बनत आहोत, असं प्रधानमंत्री म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांसाठी वंदे मातरम हाच उर्जामंत्र होता असं मोदी म्हणाले.
बंगालच्या पवित्र भूमीने भारताला फक्त वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत नाही, तर देशाला राष्ट्रगीतही दिलं, असं प्रतिपादन काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी या चर्चेदरम्यान केलं. प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाद्वारे या चर्चेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून दिल्ली आणि परिसरातलं प्रदूषण, पहलगाम हल्ला, लाल किल्ला बॉम्बस्फोट, इंडिगोची समस्या इत्यादी मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.
वंदे मातरम हे गीत फक्त गाण्यासाठी नाही, आचरणात आणण्यासाठी आहे, या गीतानं सर्व भेद ओलांडून भारताला एकत्र आणलं, असं प्रतिपादन समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी केलं. वंदे मातरमचा आत्मा समजून घेऊन देशाला एकजूट करून पुढे जावं, असं आवाहन त्यांनी केलं.