आजपासून नवी दिल्लीत युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीचे २० वे अधिवेशन

 

भारताचे ‘विकास भी, विरासत भी’ हे ब्रीदवाक्य म्हणजे आधुनिकीकरण आणि शहरीकरण करतानाच देशाची सांस्कृतिक वारसा जपण्याची वचनबद्धता आहे अशी खात्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या वारसास्थळांच्या संवर्धनासाठी असलेल्या आंतरसरकारी समितीच्या 20 व्या सत्राच्या उद्घाटन समारंभाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी हा संदेश दिला आहे. 

 

नवी दिल्ली इथं आजपासून सहा दिवसांच्या सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. परंपरा जपताना कोणताही समुदाय अथवा कोणाचीही श्रध्दा लोप पावणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं ते म्हणाले. 

 

भारतासाठी वारसा कधीही जुन्या आठवणींचा विषय राहिला नाही, तर तो ज्ञान, सर्जनशीलता आणि विविध समुदायाच्या विश्वासाचा प्रवाहाची जिवंत वाहणारी नदी आहे. संस्कृती केवळ स्मारकं उभारून किंवा हस्तलिखितांनी समृद्ध होत नाही तर ती पारंपरिक सण, कला आणि कारागिरीची जपणूक करत भरभराटीला येते या समजुतीने भारताचा संस्कृतीचा प्रवास आकाराला आला आहे. असे गौरवोद्गारही मोदी यांनी काढले. 

 

अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी आंतरसरकारी समितीचे 20 वे सत्र आज नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सुरू होत आहे. या सत्राचे अध्यक्षपद युनेस्कोमधील भारताचे राजदूत आणि कायमस्वरूपी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा यांच्याकडे असेल.

 

भारताने यावर्षी युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीसाठी प्रकाशाचा सण दिवाळीला नामांकित केलं आहे. यासाठी मूल्यांकन संस्थांनी यापूर्वी पुनरावलोकन केलेल्या या प्रस्तावावर अधिवेशनादरम्यान चर्चा केली जाईल असं केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं आहे.