प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथून 62 हजार कोटीं रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचं उद्घाटन करतील. युवा कौशल्य विकासासाठी या ऐतिहासिक उपक्रमात, पंतप्रधान देशभरातील एक हजार सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणाकरिता पीएम-सेतूचा शुभारंभ करतील.
बिहारमधील पाच लाख पदवीधरांना दोन वर्षांसाठी एक हजार रुपये मासिक भत्ता देण्यासबंधी सुधारित – ‘मुख्यमंत्री निश्चय स्वयंम सहाय्य भत्ता योजना’- देखील मोदी सुरू करतील. उद्योग-केंद्रित अभ्यासक्रम आणि व्यवसायिक शिक्षणाला चालना देण्यासाठी ते बिहारमधील जन नायक करपूरी ठाकूर कौशल्य विद्यापीठाचं उद्घाटन करतील.
बिहारमधील चार विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक आणि संशोधन सुविधांची पायाभरणी तसंच बिहटा इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात एनआयटी पटनाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण देखील मोदींच्या हस्ते करण्यात येईल. याव्यतिरिक्त, 34 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या नवोदय विद्यालयं आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये स्थापित एक हजार दोनशे व्यावसायिक कौशल्य प्रयोगशाळांचं पंतप्रधान उद्घाटन करतील.