भारत आणि फिजी या दोन देशांमध्ये एक महासागर असला, तरी या दोन्ही देशांच्या आकांक्षा एकत्र प्रवास करतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. त्यांनी आज फिजीचे प्रधानमंत्री सितिवेनी राबुका यांची भेट घेतली आणि दोन देशांमधली मैत्री आणखी बळकट कशी करता येईल, यावर चर्चा केली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर संयुक्त निवेदन दिलं. आरोग्य, संरक्षण, शिक्षण, संस्कृती, हवामान बदल इत्यादी क्षेत्रांमध्ये एकत्र काम करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितलं.
फिजीची राजधानी सुवा इथं भारत १०० खाटांचं सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधेल, डायलिसिस युनिट आणि रुग्णवाहिका पाठवेल, तसंच जनऔषधी केंद्र उभारेल. सायबर सुरक्षा आणि डेटा प्रोटेक्शन या क्षेत्रांमध्ये फिजीला मदत करेल, असं या बैठकीत ठरल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली.
संरक्षण क्षेत्रातही दोन्ही देशांमधलं परस्पर सहकार्य बळकट करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असून याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. फिजीची सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी भारत प्रशिक्षण आणि सामग्रीची मदत करेल, असंही मोदी यांनी सांगितलं. फिजीला असलेला हवामान बदलाचा धोका लक्षात घेता दोन्ही देश नवीकरणीय ऊर्जा, विशेषतः सौरऊर्जा क्षेत्रात काम करत आहेत असं सांगून आपत्ती व्यवस्थापनात फिजीची क्षमता वाढवण्यासाठी भारत मदत करेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
२०१४मध्ये प्रधानमंत्री मोदी फिजीच्या दौऱ्यावर गेलेले असताना सुरू झालेल्या फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयलंड कोऑपरेशन फिपिकमुळे भारत-फिजी संबंधांसह पॅसिफिक क्षेत्राबरोबरच्या संबंधांनाही नवी ताकद मिळाली आहे, असं मोदी म्हणाले. १९व्या शतकात भारतातून फिजीला गेलेल्या गिरमिट बांधवांनी फिजीच्या प्रगतीत योगदान दिलं आणि आपली मुळंही जपून ठेवली, असं सांगून गिरमिट दिन साजरा करायच्या घोषणेबद्दल राबुका यांचं अभिनंदन केलं.
तत्पूर्वी, दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी सात सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.