समृद्धीला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये जलद सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केलं आहे. अत्याधुनिक सुधारणांच्या आराखडयाचा आढावा घेण्यासाठी काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रधानमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली, या बैठकीमध्ये सुलभ राहणीमान तसंच व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि समावेशक समृद्धीला चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांना गती देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं.
स्वातंत्र्यदिनाला प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील विविध घोषणाच्या अमलबजावणीसाठी या उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांना प्रशासन सुलभ करण्यासाठी, आर्थिक विकासाला बळकटी देण्यासाठी आणि नागरिकांना या उपाययोजनांचा थेट फायदा मिळावा यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या उच्चस्तरीय बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल आदी उपस्थित होते.