नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी बांधलेल्या १८४ सदनिकांचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. बाबा खडक सिंह मार्गावरच्या या संकुलातल्या इमारतींना कृष्णा, गोदावरी, कोसी आणि हुगळी या चार नद्यांची नावं देण्यात आली आहेत.
या संकुलामुळे खासदारांचं जीवनमान सुधारेल आणि लोकांसाठी अधिक कार्यक्षम राहता येईल अशी आशा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. २०१४ नंतर ३५० पेक्षा जास्त घरं बांधण्यात आली असून, यामुळे खर्चातही मोठी बचत होणार आहे. हे संकुल ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या संकल्पनेचं प्रतीक असल्याचं सांगून, प्रत्येक प्रांताच्या सणांचं आयोजन इथं व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी शेंदूर वृक्षाचं रोप लावलं, तसंच या संकुलांचं बांधकाम करणाऱ्या कामगारांशी संवाद साधला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, मनोहरलाल खट्टर आदी मान्यवर उपस्थित होते.