पश्चिम बंगालच्या भूमीनं अनेक महत्त्वाच्या व्यक्ती देशाला दिल्या आहेत, ही भूमी प्रेरणादायी आहे. पोलाद उद्योगाची भूमी असलेला हा भूभाग एकेकाळी रोजगार निर्मितीचे केंद्र होतं अशा शब्दांत प्रधानमंत्र्यांनी पश्चिम बंगालचा गौरव केला. पश्चिम बंगालमध्ये काल तेल, वायू, रेल्वे आणि रस्ते या क्षेत्रामधील पाच हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी उपस्थित जनसमुदायाला ते संबोधित करत होते.
राज्यातून तरूण रोजगाराच्या शोधार्थ बाहेर राज्यात जात असल्याचं सांगून पश्चिम बंगालला विकास आणि परिवर्तनाची गरज असल्याचं सांगितलं. राज्याच्या विकासासाठी तसेच राजकीय परिवर्तन करण्यासाठी भाजपला सत्तेत आणण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तत्पुर्वी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्येही विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मोतिहारीतल्या सभेला संबोधित करताना, केंद्र आणि राज्य सरकार बिहारच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय पूर्व भागातल्या राज्यांच्या विकासासाठी काम करत असून, या राज्यांच्या विकासाशिवाय भारत विकसित देश होऊ शकत नसल्याचं ते म्हणाले.