‘2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी पोलाद उद्योगानं पुढाकार घ्यावा’, असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. ते काल मुंबईत इंडिया स्टील 2025 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत बोलत होते. स्टील उद्योग भारताच्या संकटात टिकून राहण्याच्या क्षमतेचं प्रतीक असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकार अनेक विकसित देशांशी FTA, अर्थात मुक्त व्यापार करार करण्याच्या प्रक्रियेत असून त्यामुळं भारतीय स्टीलच्या निर्यातीला चालना मिळेल,असंही गोयल यांनी सांगितलं.
गेल्या गुरुवारपासून मुंबईत सुरु असलेल्या या परिषदेला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दूरस्थ पद्धतीनं संबोधित केलं. गेल्या दहा वर्षात पायाभूत सुविधा आणि कारखानदारीला केंद्रसरकारनं चालना दिल्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये पोलादाची मागणी अनेक पटीनं वाढली आहे, असं त्यांनी सांगितलं. उद्योगांनी त्यांच्या गरजा सांगितल्या, तर त्या अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्हाला उत्पादन करता येईल, असं ते म्हणाले.