पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडवली बाजारातून निधी देशातली पहिली महानगरपालिका ठरल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हरित कर्जरोखे लिस्टिंग कार्यक्रम मुंबई इथं मुंबई शेअर बाजाराच्या सभागृहात आज झाला तेव्हा ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जारी केलेल्या हरित कर्जरोख्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कर्जरोखे जारी झाल्यानंतर काही मिनिटातच शंभर कोटींची गुंतवणूक झाली. यावरून हरित कर्जरोख्यांवरचा गुंतवणूकदारांचा विश्वास दिसतो, असं फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारकडूनही २० कोटींचं प्रोत्साहनपर अनुदान महानगरपालिकेला मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते.