मतदार याद्यांचं पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणाचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला. या विषयावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसातून दोन वेळा तहकूब झालं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी शांततेचं आवाहन केल्यानंतरही विरोधक चर्चेसाठी आग्रही राहिले. त्यामुळे दोन्ही सभागृहाचं नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

त्याआधी सखोल पुनरीक्षणावर तातडीने चर्चा सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली. लोकशाही आणि नागरिकांच्या हितासाठी ही चर्चा होणं गरजेचं आहे, असं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

तर विरोधकांच्या घोषणाबाजीवर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार सर्व विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी तयार आहे. मात्र सगळ्या चर्चा आत्ताच व्हाव्यात हा विरोधकांचा अट्टाहास योग्य नाही, नवे नवे मुद्दे शोधून संसदेच्या कामकाजात अडथळा आणणं बरोबर नाही असं रिजिजू संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. 

सकाळी अकरा वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी जॉर्जियाच्या संसदीय शिष्टमंडळाचं स्वागत केलं. 

सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणासह इतर मागण्यांवर चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच मंत्र्यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी करायला सुरुवात केली. 

सभागृह तहकूब होऊन दुपारी बारा वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर प्रश्नोत्तराचा तास पुन्हा सुरू झाला. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व राज्यांमधल्या सर्व क्षेत्रात विकास व्हायला हवा असं मत्सव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे मत्स्यव्यवसायात मोठं परिवर्तन घडल्याचं त्यांनी सांगितलं. 

ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारने सहकार क्षेत्रात अनेक परिवर्तनकारी पावलं उचलली, असं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. देशातल्या सहकारी संस्थांना बळ देण्यासाठी सरकारने सहकार मंत्रालयाची स्थापना केली, असंही ते म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. 

दुपारी दोन  वाजता सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा एकदा प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून या योजनेद्वारे आतापर्यंत २१ हप्त्यांमधे शेतकऱ्यांना ४ लाख  कोटी रुपये मदत वितरित केल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. शेतकरी केंद्रित डिजिटल पायाभूत सुविधांमुळे कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतकऱ्यांना थेट लाभ दिला जातो असं चौहान म्हणाले. यानंतर घोषणाबाजी न थांबल्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणाविषयी चर्चा करण्याची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं. मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२५ वर सभागृहात चर्चा सुरू आहे.