संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी कामकाजात अडथळे आले. विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळे संसदेचं कामकाज आधी दुपारी १२, नंतर दुपारी २ वाजेपर्यंत आणि अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं. 

 

लोकसभेत आज कामकाज सुरू झालं तेव्हा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दिवंगत अभिनेता धर्मेंद्र, निवृत्त कर्नल सोना राम चौधरी, प्राध्यापक विजय कुमार मल्होत्रा आणि रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहिली.  त्यानंतर लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. यावर बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली आणि कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन केलं. बिर्ला यांच्या आवाहनानंतरही घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे सभापतींनी दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झालं तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक, आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक, २०२५ सादर सभागृहात सादर केली. मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं. विरोधी पक्षांची घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आलं. 

 

राज्यसभेत आज ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली. नॅशनल कॉन्फरन्सचे गुरविंदर सिंग ओबेरॉय, चौधरी मोहम्मद रमजान आणि सज्जाद अहमद किचलू यांनी वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून शपथ घेतली. पहिल्यांदाच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवणारे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांचं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपतीपदापर्यंतचा प्रवास लोकशाहीची खरी ताकद दर्शवतो असं मोदी यावेळी म्हणाले. त्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाजही २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.