संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ सुरूच राहिला. लोकसभेत विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या घोषणाबाजीमुळं सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर २६व्या करगिल विजय दिवसानिमित्त सर्व सभासदांनी या युद्धात वीरश्री गाजवलेल्या जवानांना अभिवादन केलं आणि यात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ मौन पाळलं. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला.
इतक्यात विरोधी पक्षांचे सदस्य बिहारच्या मतदार यादी पुनरीक्षणासह इतर मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत हौद्यात उतरले. बिर्ला यांनी त्यांना सभागृहाचं कामकाज चालू देण्याची विनंती केली, तसंच ही वर्तणूक सभागृहाच्या शिस्तीला धरून नसल्याचं सांगितलं. मात्र, विरोधकांचा गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.