विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेच्या कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासाने सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षणासह इतर विषयांवर चर्चा करण्याची मागणी करत काही विरोधक सभागृहाच्या हौद्यात उतरले. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना आपापल्या जागी जाऊन सभागृहाचं कामकाज सुरू करावं, असं आवाहन केलं. मात्र, विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्याने बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.
या गदारोळातच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सीएनजी कव्हरेज संबंधित प्रश्नाचं उत्तर दिलं. जवळपास संपूर्ण देशात आता स्वच्छ ऊर्जेचा वापर होत असल्याचं पुरी यांनी या उत्तरावेळी सांगितलं. सीएनजी आणि पीएनजीसह सर्व प्रकारच्या ऊर्जा संक्रमणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही पुरी यांनी यावेळी सांगितलं.