संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याल्या आज २४ वर्ष पूर्ण होत असून या हल्ल्यातल्या हुतात्म्यांचं स्मरण म्हणून देश आज त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. २००१ मध्ये झालेल्या या हल्ल्यात संसदेचं रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या सुरक्षा रक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रद्धांजली वाहिली असून या शूरवीरांनी दाखवलेलं धैर्य, साहस आणि समर्पणाला राष्ट्र अभिवादन करत आहे, त्यांची कर्तव्यनिष्ठा देशाच्या राष्टभावनेला सदैव मार्गदर्शन करत राहील, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
यानिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, जितेंद्र सिंह आणि इतर नेत्यांनी आज संसद भवन परिसरात शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि इतर संसद सदस्यांनीही हुतात्म्यांना पुष्पांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनीही शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.