डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नेमबाज स्वप्नील कुसळेवर अभिनंदनाचा वर्षाव…

ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कास्यपदकाला गवसणी घालणारा नेमबाज स्वप्नील कुसळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये भारतानं नेमबाजीत तीन पदकं मिळवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्वप्नीलच्या समर्पण आणि चिकाटीमुळे जागतिक मंचावर संपूर्ण देशाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी त्यानं केली असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल स्वप्नील कुसळेचं कौतुक केलं आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे. त्याची जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाला सलाम, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील कुसळेच्या कुटुंबियांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचं अभिनंदन केलं. नेमबाज स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळे याला एक कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनीही स्वप्नीलचं कौतुक केलं आहे. कोल्हापूरच्या मातीतल्या या सुपुत्रानं महाराष्ट्राचा गौरव वाढवला असून राज्याच्या क्रीडाक्षेत्राला नवं चैतन्य, ऊर्जा दिली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.