परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं दिली. या प्रकरणातल्या विविध तक्रारींची सुनावणी काल आयोगासमोर झाली आणि आयोगानं मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, तसंच परभणीचे सीआयडी पोलीस उपअधीक्षक यांना नोटीस बजावली आणि अहवाल मागवले.
तसंच दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ज्या पोलिसांना सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार धरलं आहे, त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी आयोगानं त्यांनाही नोटिस पाठवली. परभणीत भारतीय राज्यघटनेच्या प्रतिमेची मोडतोड झाल्यानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी ३५ वर्षांच्या सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली होती. १५ डिसेंबर रोजी परभणीतल्या सरकारी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता.