देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या १३७वी जयंतीनिमित्त आज देशाने आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर पंडित नेहरु यांना अभिवादन करणारा संदेश लिहीला आहे. नवी दिल्लीत शांतिवन या नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पुष्पांजली अर्पण केली. दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
मुंबईत राजभवन, विधानभवन,मुंबई महानगरपालिका तसंच सर्व जिल्हा मुख्यालयांमधे दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहिली. आरोग्यविज्ञान विद्यापीठासह विविध संस्थांमधे हा कार्यक्रम झाला.
पंडित नेहरु यांच्या जयंतीदिनी बालदिन साजरा केला जातो. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम झाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात लहान मुलांशी संवाद साधला. आकाशवाणी दिल्लीच्या परिसरात लहान मुलांसाठी लिली या चित्रपटाचं प्रदर्शन झालं. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते. वेव्ज ओटीटी मंचाबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली.
मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रात रॉबिन्सन क्रूसो या त्रिमिती चित्रपटाचं प्रदर्शन झालं. नागपूर मध्यवर्ती कारागृहात, बंदिवानांची त्यांच्या अपत्यांशी भेट घडवून आणण्याचा कार्यक्रम झाला.