हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं आज पहाटे उत्तरप्रदेशात मिर्झापूर इथं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.
खयाल गायकीबरोबरच ठुमरी, भजन, कजरी आणि चैती गायनासाठी ते प्रसिद्ध होते. शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताचा मिलाफ त्यांनी आपल्या गायकीतून पेश केला. खेले मसाने में होली ही त्यांची होरी विशेष गाजली. १९३६मधे जन्मलेले छन्नूलाल मिश्रा यांनी सुरुवातीचं शिक्षण त्यांचे आजोबा प्रसिद्ध तबला वादक गुंडई महाराज शांताप्रसाद यांच्याकडून घेतलं. त्यानंतर वडील बद्रीप्रसाद मिश्रा, आणि किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल ग़नी खान आणि ठाकूर जयदेव सिंग यांच्याकडेही ते शिकले. २०१० मधे त्यांना पद्मभूषण तर २०२० मधे पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. संगीत नाटक अकादमी सह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.
छन्नूलाल मिश्रा यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी वाराणसीत मणिकर्णिका घाटावर अंतिम संस्कार होतील. छन्नूलाल मिश्रा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख प्रकट केलं असून आदरांजली वाहिली आहे.