एसटी, अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं उत्पन्नवाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुंबईत ही माहिती दिली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करत, सुधारणा, ‘वेग’ आणि ‘नियमितता’ या आधारे एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केल्याचं त्यांनी सांगितलं.
यात स्वच्छ, टापटीप बसस्थानकं, प्रसाधनगृहांची दररोज किमान तीन वेळा तपासणी, उशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द बस फेऱ्यांची प्रवाशांना योग्य माहिती, पर्यायी व्यवस्था आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्धी, अशा प्रवासी सुविधांना केंद्रस्थानी ठेवणारी उपाययोजना राबवली जाणार आहे. तक्रारींची तातडीनं दखल, नोंद आणि निराकरण यावर विशेष भर देण्याचे निर्देश आगार व्यवस्थापकांना दिले आहेत.
एसटीच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या दिशेनं ही पंचसूत्री केवळ मार्गदर्शक तत्त्वं नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेला बदलण्याचा एक ठोस आराखडा आहे. असं मंत्री सरनाईक म्हणाले.