टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं आषाढी वारीसाठी काल आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. रात्री आठनंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री उशिरा मंदिर आणि शहर प्रदक्षिणा झाल्यावर पालखी सोहळा आजोळघरी विसावला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाला. त्यानंतर आकुर्डीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हा पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावला. जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. पुणे जिल्हा प्रशासन आणि पुणे महापालिकेतर्फे वारकऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.