पाकिस्तानी सैन्यानं दहशतवाद्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला, भारताला त्याचा प्रतिकार करणं गरजेचं होतं, त्यामुळे पाकिस्तानच्या नुकसानीसाठी ते स्वतःच जबाबदार आहेत, असं एअर ऑपरेशन्सचे डिरेक्टर जनरल एअर मार्शल ए के भारती यांनी सांगितलं. तिन्ही संरक्षण दलाच्या वार्ताहर परिषदेत ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. भारताची लढाई ही पाकिस्तानी लष्कर किंवा नागरिकांशी नसून दहशतवाद्यांशी होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पाकिस्तानने लढाऊ विमानं आणि ड्रोनच्या सहाय्याने केलेला हल्ला भारतीय हवाई दलानं हाणून पाडला. मात्र भारताची सुरक्षा व्यवस्था अभेद्य होती, ती भेदणं पाकिस्तानला अशक्य होतं, असं भारती म्हणाले. आकाश या हवाई संरक्षण प्रणालीच्या कामगिरीचा त्यांनी विशेष उल्लेख केला. भारतानं पाकिस्तानच्या नूर खान एअरबस आणि रहीम यार खान एअरबसचा अचूक वेध घेतल्याचं एअर मार्शल भारती यांनी सांगितलं.
पाकिस्ताननं ९ आणि १० मे रोजी भारतीय हवाई तळावर केलेले हल्ले रोखण्यात भारताला यश आल्याचं लष्कराच्या मोहिमांचे महासंचालक लेफ्टनंद जनरल राजीव घई यांनी सांगितलं. सीमा सुरक्षा दलाच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं.
नौदल विविध ठिकाणांहून येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम असल्याचं नौदलाच्या मोहिमांचे महासंचालक व्हाईस ऍडमिरल ए एन प्रमोद यांनी सांगितलं. धोका ओळखून तो परतवून लावण्यासाठी नौदल सतत देखरेख करत आहे, असंही ते म्हणाले.