पाकिस्तानमध्ये सिंध प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे उद्भवलेल्या डेंग्यू च्या आजारानं गंभीर स्वरूप घेतलं असून, हैदराबाद प्रांतात १६ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या गोष्टीची दखल घेऊन सिंध प्रशासनानं तात्काळ आरोग्य विषयक आणीबाणी जाहीर करावी, डेंग्यू साठी समर्पित कृती दल स्थापन करावं आणि सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत चाचणी सुविधा पुरवावी अशी मागणी पाकिस्तानमधल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
सिंध प्रांतात हजारो नागरिकांमध्ये डेंग्यूचं संक्रमण झालं असून, शेकडो नागरिक रुग्णालयात भर्ती आहेत. त्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे, रुग्णालयांमधल्या पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत आणि अत्यावश्यक गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. या गोष्टीला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.