पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आज इस्तंबूलमध्ये सीमापार दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी संयुक्त देखरेख यंत्रणा उभारण्यावर चर्चेची दुसरी फेरी पार पडली. मात्र, दहशतवाद, ही आपली प्रमुख समस्या असून, त्यावर तोडगा निघाला नाही, तर युद्ध हा एकमेव पर्याय असल्याचा इशारा पाकिस्ताननं दिला आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान गेले काही दिवस सुरु असलेल्या संघर्षात अनेक सैनिक, नागरिक आणि दहशतवादी ठार झाले असून, या भागात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. मात्र गेल्या १९ ऑक्टोबर रोजी दोहा इथं दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या चर्चेनंतर तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली होती.
दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करून देशांतर्गत अराजकतेपासून जगाचं लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानी लष्करामधल्या एका प्रभावशाली गटानं हा संघर्ष सुरु केल्याचा अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचा आरोप आहे.