पहलगाम दहशतवादी हल्ल्यातले आरोपी, त्यांची संघटना आणि त्यांना आर्थिक मदत पुरवणारे या सगळ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई केली जावी असं आवाहन क्वाड सदस्य देशांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी यासाठी सहकार्य करावं अशी विनंतीदेखील सदस्य देशांनी केली. क्वाड सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची अमेरिकेत बैठक झाल्यानंतर एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं.
या निवेदनात पहलगाम घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. क्वाड देशांनी खुल्या आणि मुक्त हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राबद्दलची आपली वचनबद्धता पुन्हा बोलून दाखवत पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रातील सध्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. या क्षेत्रातील कायद्याची अंमलबजावणी, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता कायम राखण्याप्रतीही आपण वचनबद्ध आहोत असं या निवेदनात म्हटलं आहे.