भ्रष्टाचार, मराठीवर अन्याय, हिंदीची सक्ती, शक्तिपीठ महामार्गाला विरोध इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा महाविकास आघाडीनं आज केली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज मुंबईत झाली, त्यानंतर विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.
राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आणि हे सर्व मुद्दे विधिमंडळात उपस्थित करणार असल्याचं नमूद केलं. राज्यातली वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री का गप्प आहेत, युतीधर्मामुळे त्यांनी मौन बाळगलं आहे का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारी या मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य केलं, तर मतांच्या राजकारणासाठी मराठी माणसाचा, मराठी भाषेचा बळी सरकार देत असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. अशा सरकारसोबत चहापानाला जाणं योग्य नाही, त्यामुळे चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतल्याचा पुनरुच्चार या सर्व नेत्यांनी केला.