ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी फेटाळून लावला. ते आज राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेदरम्यान बोलत होते. युद्ध थांबवण्यासाठी जगातल्या कोणत्याही नेत्यानं मध्यस्थी केली नाही, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवर बोलताना पाकिस्तानने हल्ला केला तर भारत प्रतिहल्ला करेल असं भारतानं स्पष्ट केलं होतं, असं जयशंकर म्हणाले. भारतीय सैन्याच्या हल्ल्यात पाकिस्तानातील मुरीदके आणि बहावलपूर ही दहशतवादी तळं उद्ध्वस्त झाली, सैन्यदलाच्या कामगिरीचा सर्वांना अभिमान आहे, असं जयशंकर म्हणाले.
भारताने गेल्या दशकभरात दहशतवादाचा मुद्दा जागतिक मंचांवर यशस्वीपणे ठेवला, भारत कुण्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप स्वीकारणार नाही आणि अणुबॉम्बच्या धमकीला घाबरणार नाही, हा स्पष्ट संदेश ऑपरेशन सिंदूरद्वारे दिल्याचं जयशंकर यांनी सांगिलं.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यानी जम्मू काश्मीरला भेट दिली, तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा सोडून परत आल्याचं केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी नमूद केलं. यातून सरकार या मुद्द्यावर किती संवेदनशील आहे हे दिसतं असं नड्डा म्हणाले. नड्डा यांनी ऑपरेशन सिंदूरमधे सैन्यदलाने केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. तसंच देशात दहशतवादी कारवायांमधे आधीच्या तुलनेत घट झाल्याचं स्पष्ट केलं.
पहलगाममधे २६ लोकांची हत्या कशी झाली हे अजूनही गृहमंत्रालय सांगू शकलं नाही, पहलगाम हल्ल्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घ्यायला हवी, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत राज्यसभेत बोलताना म्हणाले. या चर्चेत द्रमुकचे एन आर एलांगो, तृणमूल काँग्रेसच्या डोला सेन, समाजवादी पक्षाच्या जया बच्चन, राजदचे मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फौजिया खान यांनीही सहभाग घेतला.