डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवादी, तर पाकचे ३५ ते ४० जवान ठार

पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी आज दिली.

 

लष्करी कारवाई महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई, हवाई कारवाई महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती आणि नौदल कारवाई महासंचालक व्हाइस डमिरल ए. एन. प्रमोद यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत देऊन भारताच्या हवाई हल्ल्याविषयी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाविषयीचे तपशील समोर ठेवले. 

 

ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये कुख्यात दहशतवादी युसुफ अजहर, अब्दुल मलिक रौफ, मुदस्सिर अहमद यांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं हाच होता, ही बाब भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी अधोरेखित केली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ वारंवार झालेला गोळीबार, भारताच्या हद्दीत आलेले असंख्य ड्रोन्स, इतर तत्सम यंत्रं यामुळे भारतानं स्वसंरक्षणासाठी आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या सशस्त्र दलांच्या तळांना लक्ष्य केलं असून या कारवाईत पाकिस्तानचे ३५ ते ४० जवान मृत्युमुखी पडल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

काल संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर काही तासांतच पाकिस्ताननं पुन्हा सीमेपलीकडून गोळीबार केल्याचं उल्लेख करून, या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर द्यायचं पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला दिलं असल्याचंही लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं. भारतानं आत्तापर्यंत केलेल्या कोणत्याही कारवाईचा उद्देश पाकिस्तानी सशस्त्र दलांना किंवा नागरिकांना लक्ष्य करणं हा नव्हता, तर तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं हेच भारताचं लक्ष्य होतं, यावर या तिन्ही अधिकाऱ्यांनी भर दिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.