डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळं रवाना

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधीमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत. याअंतर्गत  भाजपाचे खासदार बैजयंत पांडा, काँग्रेस खासदार शशी थरुर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील आणखी तीन सर्वपक्षीय शिष्टमंडळं आज पहाटे परदेशी रवाना झाली.

 

द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वातल्या प्रतिनिधीमंडळानं आज रशियात मॉस्को इथल्या भारतीय दूतावासात संयुक्त पत्रकार परिषदेत दहशतवादाविरोधातलं भारताचं शून्य सहिष्णता धोरण स्पष्ट केलं. पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याविरोधातल्या भारताच्या संयमित कारवाईची माहितीही त्यांनी दिली. 

 

संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालच्या प्रतिनिधीमंडळानं आज जपानमधल्या दूतावासात तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधून पहलगाम दहशतवादी हल्ल्यातली पाकिस्तानची भूमिका उघड केली. यानंतर हे प्रतिनिधीमंडळ दक्षिण कोरियाला रवाना झालं. 

 

भाजपाच्या खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ आज बहरीनला पोहचलं. तिथे ते दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका मांडतील. या प्रतिनिधीमंडळात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासह इतर प्रतिनिधींचाही समावेश आहे.

 

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळ पहिल्या टप्प्यात गयाना इथं जाणार असून, त्यानंतर ते अमेरिका, पनामा, ब्राझील आणि कोलंबियाला भेट देणार आहेत.