ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नसून भारतीय नौदल प्रभावीपणे तैनात असल्याचं नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल वात्सायन यांनी म्हटलं आहे. भारतीय नौदल हिंद महासागर क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक चिनी जहाजावर आपण लक्ष ठेवून आहोत असं त्यानी सांगितलं. फेब्रुवारी 2026 मध्ये विशाखापट्टणम इथे होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू आणि मिलान सरावाबद्दल वात्सायन यांनी माध्यमांना माहिती दिली.
अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी या आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी होण्याची पुष्टी केली आहे. दरम्यान, पाकिस्तानलगतच्या भारताच्या पश्चिम सीमेवर त्रिशूल हा बहू आयामी त्रि-सेवा सराव सुरू असल्याची माहिती नौदल कार्यवाही महासंचालक व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद यांनी दिली आहे. भारतीय लष्कराची दक्षिण कमांड, भारतीय नौदलाची पश्चिम कमांड, हवाई दलाची दक्षिण-पश्चिम हवाई कमांड, तसंच तटरक्षक दल, बीएसएफ आणि अन्य केंद्रीय संस्था त्रिशूल सरावात सहभागी झाल्या आहेत. नौदल 25 नौदल युद्धनौका तर हवाई दल 40 लढाऊ विमानांसह यामध्ये सहभागी होणार आहेत.
13 तारखेपर्यंत चालणाऱ्या या सरावाचा उद्देश सर्व सागरी दलांसह विविध आंतर-सेवा दलांमधील समन्वय वाढवणे हा आहे.