भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल साऱ्या जगानं भारताला पाठिंबा दिला आहे.
भारताला दहशतवादापासून स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं इस्राएलने म्हटलं आहे. भारतातले इस्राएलचे राजदूत रुवेन अझर यांनी म्हटलं आहे की निरपराधांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना तोंड लपवायला जागा नाही हे समजलं पाहिजे.
रशियाच्या परदेश मंत्रालय प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी कोणत्याही प्रकरच्या दहशतवादी कृत्याचा रशिया निषेध करत असल्याचं सांगून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्याचं आवाहन केलं आहे.
जपानचे परराष्ट्र मंत्री इवाया ताकेशी यांनी दहशतवादाविरोधातल्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार करत, दोन्ही देशांनी संयम ठेवावा, असं आवाहन केलं आहे. जर्मनी दोन्ही देशांच्या संपर्कात असून त्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानंही शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. संयुक्त अरब अमिरातीचे उपप्रधानमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान यांनी भारत आणि पाकिस्तानशी संपर्क साधून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुर्रहमान बिन जासिम अल थानी यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याशी संवाद साधून शांतता आणि संवादाच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी मदत देऊ केली आहे.
पहलगाम हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करणारे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं आवाहन केलं आहे.