ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याची माहिती हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी आज बेंगळुरू इथं एका व्याख्यानात दिली. यात पाकिस्तानी हवाई दलाच्या पाच, तर एका सूचना आणि नियंत्रण विमानाचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही कारवाई जवळपास ३०० किलोमीटर अंतरावरून केल्याचं सांगून जमिनीवरून हवेत मारा करण्याचा हा उच्चांक असल्याचंही सिंह यांनी नमूद केलं.
शाहबाज जेकोकाबाद हवाई तळावर भारतानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात काही विमानांचं नुकसान झाल्याचंही ते म्हणाले. भारताने या कारवाईदरम्यान अतिशय अचूक हल्ले केले आणि तिन्ही सशस्त्र दलांच्या समन्वयाचं दर्शन घडवलं, तसंच हवाई संरक्षण यंत्रणांनीही उत्तम कामगिरी केली, असं मत सिंह यांनी मांडलं.