ऑपरेशन सिंदूर स्थगित केलेलं आहे, संपलेलं नाही. पाकिस्तानने भविष्यात कोणतीही आगळीक केली, तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होईल, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं. ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेच्या प्रारंभी ते बोलत होते.
(या कारवाईत भारताच्या सेनादलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले ९ दहशतवादी तळ लक्ष्य केले. यापैकी ७ तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. यात १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज आहे, असं ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणं, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणं, आणि दहशतवादाबाबत भारताचं कठोर धोरण अधोरेखित करणं हे होतं, कोणत्याही युद्धाला तोंड फोडण्याचा यामागचा हेतू नव्हता, असं प्रतिपादन त्यांनी केलं. भारताच्या प्रत्युत्तरामुळे १० मे रोजी पाकिस्तानने हार मानली आणि शस्त्रसंधी करण्याचा प्रस्ताव ठेवला.)
ऑपरेशन सिंदूरसाठी ठरवलेली राजकीय आणि लष्करी उद्दिष्टं पूर्ण झाल्यामुळे ही कारवाई थांबवली. कुणाच्या दबावामुळे शस्त्रसंधी केल्याचे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहेत, असं ते म्हणाले. कोणत्याही कारवाईत अंतिम परिणाम महत्त्वाचा असतो. दहशतवाद आणि संवाद एकत्र चालू शकत नाहीत ही भारताची भूमिका आहे, असंही ते म्हणाले.
यानंतर विविध पक्षांच्या खासदारांनी या चर्चेत भाग घेतला. (या चर्चेचा उद्देश पहलगामचं, ऑपरेशन सिंदूरचं, भारताच्या परराष्ट्र धोरणाचं सत्य सभागृहासमोर यावं, हा होता, असं प्रतिपादन केलं. हे युद्ध माहितीचं होतं आणि) संरक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणात खूप माहिती दिली, मात्र पहलगाममध्ये दहशतवादी कसे घुसले, २६ पर्यटकांना त्यांनी गोळ्या घालून कसं मारलं, याची माहिती त्यांच्या बोलण्यात आली नाही, अशी टीका काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केली.
तर, पहलगामध्ये पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी अद्याप पकडले न गेल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर टीका केली. आम्ही सशस्त्र दलांचं कौतुक करू, सरकारचं नाही, असं ते म्हणाले. पाकिस्ताननं शस्त्रसंधीसाठी विनवण्या केल्या असं सरकार म्हणतं, तर बिनशर्त युद्ध का थांबवलं, जगातल्या एकाही देशानं आपल्याला का साथ दिली नाही, असे प्रश्न त्यांनी विचारले. चर्चा अद्याप सुरू असून कामकाजाची वेळ रात्री १२ वाजेपर्यंत वाढवली आहे.