भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल जगभरात विविध प्रतिक्रीया उमटल्या आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेली ऑपरेशन सिंदूर ही कारवाई म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे, असं पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांनी म्हटलं असून या हल्ल्याला उत्तर देण्याचा अधिकार पाकिस्तानला असल्याचं ते म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव लवकरच संपेल, अशी आशा व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील स्थितीवर आपण बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं म्हटलं आहे. शांततापूर्ण तोडगा निघावा यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष दोन्ही देशांच्या नेतृत्वाशी चर्चा सुरू ठेवतील असंही त्यांनी पुढे सांगितलं.
संयुक्त अरब अमिरातींचे उपप्रधानमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान यांनी भारत आणि पाकिस्तानशी संपर्क साधून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.