देशाच्या तिन्ही सैन्यदलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यापासून जवळच नांगरलेल्या आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत प्रधानमंत्र्यांनी दिवाळी साजरी केली, त्यावेळी ते बोलत होते. आयएनएस विक्रांत ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया उपक्रमाचं प्रतीक आहे. ही केवळ एक युद्धनौका नाही, तर २१ शतकातल्या भारताच्या परिश्रम, प्रतिभा आणि वचनबद्धतेचंही प्रतीक आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.
गेल्या दशकभरात भारतीय सेना आत्मनिर्भरतेकडे मार्गक्रमण करत आहे. या काळात ४० पेक्षा जास्त युद्धनौका आणि पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या असून स्वदेशीवर भर दिला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या दशकभरात संरक्षण उत्पादनात तीनपट वाढ झाली आहे, तिन्ही सेनादलांसाठी शस्त्र आणि उपकरणांचं उत्पादन देशातच करण्यावर भर दिला जात असून भारत शस्त्रास्त्र निर्यातीत जगातला आघाडीचा देश बनेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला.
जवानांसोबत दिवाळी साजरी करणं आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचं सांगत प्रधानमंत्री मोदी यांनी नौदल जवानांना मिठाईचं वाटप केलं. तसंच सैन्यदलाच्या सामर्थ्याचा गौरव केला. काल संध्याकाळी विक्रांतवर आयोजित बडा खाना भोजनसमारंभात प्रधानमंत्री सहभागी झाले होते.