डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारतीय सैन्याकडून जम्मूजवळील पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त

भारतीय सैन्याने जम्मूजवळील पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त केली आहेत. या ठिकाणांवरून ट्यूब-लाँच प्रकारचे ड्रोन सोडले जात होते. याशिवाय भारतीय संरक्षण यंत्रणेने काल रात्री बारामुल्ला ते भुज पर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा आणि पाकिस्तान सोबत असलेल्या नियंत्रण रेषेवरच्या 26 ठिकाणी पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यांची मालिका यशस्वीपणे उधळून लावली आहे.

 

यामध्ये नागरी आणि लष्करी स्थळांना संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या संशयित सशस्त्र ड्रोन्सचा समावेश  आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगड जट्टा, जैसलमेर; बारमेर, भुज, कुअरबेट आणि लाखी नाला या ठिकाणी हे ड्रोन आढळून आले आहेत.

 

याबाबत भारतीय सशस्त्र दलांनी अधिक सतर्कता बाळगली आहे. अशा सर्व हवाई धोक्यांचा मागोवा ड्रोन-विरोधी प्रणालीचा वापर करून घेतला जात आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार त्वरित कारवाईही केली जात आहे. सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना घरात राहण्याचा, अनावश्यक हालचाली मर्यादित ठेवण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा सूचनांचं काटेकोर पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

 

पंजाबमधील फिरोजपूर, अमृतसर आणि पठाणकोटसह सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये या सशस्त्र ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय संरक्षण दलांनी हे प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडले. दरम्यान फिरोजपूरमध्ये मात्र एका घराचं  नुकसान झालं आणि हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. 

 

दरम्यान, बदलत्या परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी आज सकाळी 10 वाजता नवी दिल्लीत एका विशेष पत्रकार परिषदेचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे.