श्रीलंकेला भारताकडून ‘ऑपरेशन सागर बंधु’ अंतर्गत मदत

दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत उद्भवलेल्या आपत्तीला, भारत सरकार ‘ऑपरेशन सागर बंधु’ अंतर्गत मदत पुरवत आहे. भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरने श्रीलंकेतील विविध ठिकाणांहून, पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे 47 जणांची काल सुटका केली. दरम्यान भारतीय हवाई दलाचं सी 17 हे वाहतूक विमान काल कोलंबो इथं उतरलं असून या विमानात एक सर्व सोईंनीयुक्त इस्पितळ, 70 पेक्षा अधिक वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचारी आणि आवश्यक असलेली वाहनं आहेत असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. श्रीलंकेतील पूरग्रस्तांना भारत सर्वतोपरी मदत करेल असंही त्यांनी आपल्या समाज मध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आत्तापर्यंत 8 टनांहून अधिक साहित्य श्रीलंकेत पोहोचवण्यात आलं असून परदेशी नागरिक, गंभीर आजारी रुग्ण आणि एका गर्भवती महिलेसह 65 जणांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.