रशियाकडून तेल आयातीबाबत अमेरिका आणि युरोपीय महासंघानं भारताला लक्ष्य करणं अनुचित आणि तर्कहीन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. कोणत्याही महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांसारखांच भारतही आपल्या राष्ट्रीय हिताचं आणि आर्थिक स्थैर्याचं संरक्षण करेल, असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. रशिया आणि युक्रेन संघर्षानंतर सर्व पारंपरिक पुरवठा युरोपाकडे वळल्यामुळे भारतानं रशियाकडून कच्चं तेल आयात करणं सुरू केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. त्या वेळी अमेरिकेनंच अशा आयातीला प्रोत्साहन दिल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
तत्कालीन जागतिक बाजारपेठेतल्या परिस्थितीमुळे भारतीय ग्राहकांना रास्त दरात इंधन पुरवठा व्हावा असा त्यावेळी हेतू होता. मात्र, भारतावर टीका करणारे देशच रशियाशी व्यापार करत असल्याचं स्पष्ट झालं आहे असंही भारतानं म्हटलं आहे. अमेरिका आणि युरोपीय महासंघ रशियाबरोबर करत असलेल्या व्यापाराचे दाखलेही भारतानं दिले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याबरोबर हंगामी व्यापार करार झाल्यामुळे युरोपीय महासंघानं अमेरिकेतल्या उत्पादनांवरचं वाढीव आयातशुल्क स्थगित केलं आहे.