भगवान जगन्नाथाचा – नंदीघोष, देवी सुभद्रा आणि भगवानसुदर्शन यांचा – देवदालन आणि भगवान बलभद्राचा – तालध्वज हे तीन रथ काल पुरीच्या रस्त्यावर सूर्यास्त झाल्यावर प्रथेनुसार जागेवरच थांबवण्यात आले. आज तिथूनच त्यांच्या मावशी- देवी गुंडीच्या देवीच्या मंदिरात असंख्य भाविक हे रथ पुन्हा पुढे ओढून नेतील. या पवित्र रथयात्रेचे साक्षीदार होण्यासाठी जगभरातून लाखोभाविक पुरीमध्ये आले आहेत. या वर्षी विशिष्ट खगोलीय रचनेमुळे यंदाची रथयात्रा दोन दिवसांसाठी आयोजित केली आहे. यापूर्वी 1971मध्ये हा दुर्मिळ योग आला होता. रथयात्रा शांततेत आणि सुरळीतपणे पारपडण्यासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या रथयात्रेत सहभागी झाल्या होत्या. 12व्या शतकातील जगन्नाथ मंदिरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री गुंदिचा या मंदिराच्या दिशेनं हजारो लोकांनी हे महाकाय रथ ओढले. या रथयात्रेची सुरुवात घंटा, शंख आणि झांजा वाद्यांच्या तालावर ‘धाडी पहांडी’ हा शाही विधी पूर्ण झाल्यानंतर तिनही देवता आपल्या रथावर स्थानापन्न झाल्या, असं आकाशवाणीच्या वार्ताहराने कळवलं आहे. पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी रथांवर सोन्याच्या झाडूने झाडत छेरा पहानरा विधी पूर्ण केल्यानंतर रथ ओढण्यास सुरुवात झाली.
 
									 
		 
									 
									 
									 
									