December 12, 2025 3:24 PM

printer

बृहन्मुंबई महानगर क्षेत्रातील २० हजार इमारतींना भोगवटा

बृहन्मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल २० हजार इमारतींना भोगवटा देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात शिक्षकाच्या ३७ हजार रिक्त जागा भरण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर शिक्षक भरतीबाबत नवीन पद्धत लागू करण्याची गरज असल्याचं मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं. 

 

भिवंडी शहरातल्या सर्वे क्रमांक १३० आणि सर्वे क्रमांक १३९ ही जागा नवीन डम्पिंग ग्राउंडसाठी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्यानुसार या ठिकाणी नवीन डम्पिंग ग्राउंड उभारण्याचा प्रस्ताव शासन मंजूर करेल, अशी माहितीही सामंत यांनी दिली. यासंदर्भात विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. 

 

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल सुरू करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यात हे मॉल उभारण्यात येणार असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं. नाना पटोले, बाबासाहेब देशमुख, सुधीर मुनगंटीवार आदी सदस्यांनी उपस्थित केेलेल्या लक्षवेधीला ते विधानसभेत उत्तर देत होते. पुढल्या टप्प्यात उमेद मॉल तालुका पातळीवरही उभारले जाणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं. उमेद अभियानात कार्यरत असलेल्या समुदाय संसाधन व्यक्तींना ‘ग्रामसखी’ हे पदनाम देण्यात येणार असून या संदर्भातील शासन निर्णय आजच जारी होणार असल्याचं त्यांनी सभागृहात जाहीर केलं. 

 

पुणे महानगरपालिकेत लोहगावासह ११ नवीन गावांचा समावेश प्रस्तावित असलेल्या विकास आराखड्याची अंतिम प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. कायद्यानुसार सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतरच अंतिम विकास आराखडा जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली. बापूसाहेब पठारे यांनी याबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. 

 

याशिवाय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेलं नेत्रम ऍपमधे नोंदवलेला डेटा तपासण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात येतील त्याचप्रमाणे एमआयडीसीच्या जागेवर सुरू असलेला स्टोन क्रशर बंद केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.