नितीन नबीन यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत संघटन पर्व या कार्यक्रमात नबीन यांनी सूत्रं स्वीकारली. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नबीन यांचा एकट्याचाच अर्ज आला होता. आज संघटन पर्व या कार्यक्रमात निवडणूक निर्णय अधिकारी के. लक्ष्मण यांनी पक्षाचे १२वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांचं नाव जाहीर केलं. नितीन नबीन हे भाजपाचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.
प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांचं भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. नितीन नबीन यांच्यावर केवळ पक्षाचीच नाही तर रालोआ मधे समन्वय साधण्याची जबाबदारी आहे, नबीन हे देशात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन पाहणाऱ्या पिढीतले आहेत. याचा फायदा कार्यकर्त्यांना होईल, असं मोदी म्हणाले.
यावेळी मोदी यांनी भाजपाच्या याआधीच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आवर्जून उल्लेख केला तसंच त्यांच्या कार्यकाळात पक्षाचा विस्तार झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. माजी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही नबीन यांचं अभिनंदन केलं. नबीन यांच्या नेतृत्वात भाजपा प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.