औद्योगिक उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मोठी संधी असून देश याबाबतीत जगाचं नेतृत्व करेल, तेव्हा महाराष्ट्र देशात आघाडीवर असेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केलं. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात भारताला जगात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं तयार केलेल्या रोडमॅपचं प्रकाशन आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
वर्ष २०३५ पर्यंत जीडीपीतलं या क्षेत्राचं योगदान २५ टक्क्यांवर नेणं, १० कोटीपेक्षा जास्त रोजगार निर्माण करणं आणि जगातल्या तीन सर्वोच्च औद्योगिक उत्पादक देशांमध्ये भारताला स्थान मिळवून देणं, हे या रोडमॅपचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग आणि सेमीकंडक्टर या तीन क्षेत्रांतल्या प्रगतीचा मोठा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर पडला असून याचा फायदा कसा करून घेता येईल, याचा विचार नीती आयोगाच्या रोडमॅपमध्ये केला असल्याचं फडनवीस म्हणाले. अत्याधुनिक कारखानदारी क्षेत्रातली जगातली पहिली प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रात उभारण्याचा नीती आयोगाचा मानस असल्याची माहिती त्यांनी कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलताना दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसंच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही.आर. सुब्रह्मण्यम उपस्थित होते .