नव्या जीएसटी सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुमारे २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं जीएसटी सुधारणांबाबत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
या सुधारणांमुळे कर भरण्यात खर्च होणाऱ्या सामान्य लोकांच्या पैशांची बचत होईल, असंही त्या म्हणाल्या. नव्या सुधारणांमुळे २०२५ या वर्षात जीएसटी संकलनात वाढ होऊन ते २२ लाख कोटी रुपयांहून अधिक असेल, असं त्यांनी सांगितलं.
या सुधारणांमुळे कृषी संबंधी वस्तूंवरचा कर कमी झाल्यानं शेतीच्या आधुनिकीकरणाला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सुधारणांचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांबरोबरचं रोजगारनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रांना होईल, असंही त्या म्हणाल्या.