कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वेगानं वाढत असल्यामुळे त्याचं नियमन सुद्धा तितकंच आवश्यक झालं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
टेक रिपॉजिटरी आणि विकसित भारत संकल्पनेसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासाठीच्या धोरणाचा अहवाल निती आयोगानं आज नवी दिल्लीत सादर केला, त्यावेळी अर्थमंत्री बोलत होत्या. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराबाबत नागरिकांनी जागरूक राहायला हवं, देशातल्या सर्व जिल्ह्यांमधे विकास साधण्यसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा असं त्या म्हणाल्या.
सक्षम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशात सर्वसमावेशक विकास होत असल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. जगात मोठ्या प्रमाणात अस्थिरता असूनही भारत जलद गतीने प्रगती करत आहे, असंही ते म्हणाले.