जीएसटी कररचनेतल्या सुधारणांचं सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सुधारणांचं कौतुक केलं आहे. जीएसटीचे दर कमी करण्याच्या सरकारच्या या निर्णयामुळे सर्वांना फायदेशीर ठरणार आहे. जीवनमान सुलभ करण्यासाठी दरांचं सुसूत्रीकरण आणि सुधारणांसाठी एक सविस्तर प्रस्तावही तयार केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जीएसटीमधला बदल जीवन सुलभ आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर मोठा प्रभाव टाकेल. अशी प्रतिक्रिया आपल्या समाज माध्यमावर दिली आहे. तर जीएसटीमधली सुधारणा ही एक परिवर्तनकारी पाऊल असून शेतकरी, एमएसएमई, महिला, तरुण, मध्यमवर्गीय या सर्वांनाच दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
जीएसटी सुधारणांमध्ये कर्करोग आणि दुर्मीळ आजारांच्या उपचारांसह ३६ जीवनरक्षक औषधांवरचा जीएसटी शून्य टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा आरोग्यसेवेवरचा खर्च कमी होईल आणि जीवनमान सुधारेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. जीएसटी कररचनेतल्या सुधारणेमुळे देशातल्या प्रत्येक कुटुंबाला मदत होणार असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
उद्योग आणि व्यवसाय जगताने या सुधारणांचं स्वागत केलं आहे. विविध उद्योग संघटनांनी जीएसटी सुधारणांचं स्वागत केलं आहे. जीएसटी सुधारणेतल्या कर्जाची परतफेड आणि एमएसएमईवरचे अनुक्रमे ५ टक्के आणि १८ टक्के कर व्यवसाय प्रक्रिया सुलभ होईल, अशी प्रतिक्रिया भारतीय उद्योग महासंघ सीआयआयने दिली आहे. तर जीएसटी सुधारणा अप्रत्यक्ष कर व्यवस्थेच्या परिपक्वतेला प्रतिबिंबित करतात अशी प्रतिक्रिया फिक्की अर्थात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने दिली आहे. या सुधारणा म्हणजे करव्यवस्थेतलं एक धाडसी पाऊल असून यामुळे मागणीला चालना मिळेल, तसंच संबंधित प्रक्रिया सोप्या करतील, अशी प्रतिक्रिया फिक्कीचे माजी अध्यक्ष शुभ्रकांत पांडा यांनी दिली आहे. लहान व्यापारी, ग्राहकांसह भारताच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याचं ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशने म्हटलं असून त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.