वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकत्याच जीएसटी कररचनेत सुधारणा केल्या. यात नवीन आणि नवीकरणीय उर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी या क्षेत्राशी संबंधित विविध सामग्रीवरच्या करात कपात करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ उर्जा उत्पादन धोरणाला आणखी मजबूत करण्यासाठी आणि अपारंपरिक उर्जास्रोतांच्या वापराला चालना देण्याच्या उद्देशाने वस्तू आणि सेवा कर परिषदेने जीएसटी दरात कपात केली आहे. यात सौर कुकर, बायोगॅस प्रकल्प, सौर उर्जा निर्मितीसाठीची उपकरणं, सौर विद्युत जनित्र, सौरपंप, पवनचक्की आणि पवनउर्जेवर चालणारी जनित्र, सौर दिवे, जलविद्युत निर्मिती उपकरणं आणि प्रकल्प यांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के इतका आणण्यात आला आहे. यामुळे या उपकरणांवरच्या खर्चात कपात होऊन पारंपरिक वीजनिर्मितीवरचा ताण कमी होईल, तसंच वीजदरही घटतील. सौरपंपामुळे शेतीच्या सिंचनावरच्या खर्चातही घट होणार आहे.