वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच महत्त्वाचे बदल केले. त्याचा परिणाम विविध क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवांच्या किमतीवर होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक वस्तूंच्या किमतीत बदल संभवतात.
वैद्यकीय क्षेत्रात उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू, रसायनं आणि उपकरणांवरचा जीएसटी कर आता ५ टक्क्यांवर आणला आहे. वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सीजन, अमोनिया,तसंच सल्फ्युरिक आणि नायट्रिक अॅसिड वरचा कर पूर्वी १८ टक्के होता. रबरी हातमोजे, थर्मामीटर, विविध तपासण्यांसाठीचे संच,उपकरणं, चष्म्याची भिंगं, कॉन्टॅक्ट लेन्सेस, गॉगल्स मलमपट्टीसाठी वापरली जाणारी बँडेजेस, या सर्वांवरचा कर आता १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के राहील.
याखेरीज अनेक गंभीर आजारावरच्या औषधांवरचा कर आता शून्य टक्के झाला आहे.
GST सुधारणेमुळे आरोग्य क्षेत्राला नक्कीच दिलासा दिला आहे.
जसे की आरोग्य विम्यावरील GST १८% वरून शून्य करण्यात आला आहे, यामुळे रुग्णांना वैयक्तिक आरोग्य विमा परवडेल तसेच विमा पॉलिसी कमी खर्चात उपलब्ध होईल.
त्याचप्रमाणे कर्करोग आणि दुर्मिळ रोगांच्या औषधांवरील GST ही शून्य करण्यात आला आहे. यामुळे किमोथेरपीसारखी प्रक्रिया कमी खर्चात उपलब्ध होईल, तसेच गौचर डिसिस, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ब्लड कॅन्सर यासारख्या रोगांची औषधेही स्वस्त दरात उपलब्ध होतील. सध्या भारत डायबेटिस कॅपिटल बनण्याच्या मार्गावर आहे, तसेच हार्ट अटॅकचे प्रमाणही वाढले आहे. ग्लुकोमीटर , अँजिओप्लास्टी स्टेंट , MRI हे कमी दरात उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांवरील आर्थिक भार कमी होण्यासाठी मदत होईल.
या सुधारित GST मुळे रुग्णांना कमी दरात दर्जेदार सेवा उपलब्ध होतील, तसेच फार्मा कंपन्यांनाही नवीन औषधे बाजारात उपलब्ध करण्यासाठी आणि दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या संशोधनावर भर देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
जीएसटीवरचे नवीन दर येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.