जीएसटी सुधारणांमुळे सहकार क्षेत्राला बळकटी मिळणार असून उत्पादनात आणि मागणीत वाढ होईल, यामुळे सहकार क्षेत्राचं उत्पन्न वाढेल, असं सरकारनं म्हटलं आहे. सहकार, शेती, ग्रामीण उद्योग तसंच दहा कोटींहून अधिक दूध उत्पादनांना फायदा होईल, अशा महत्त्वाच्या क्षेत्रात जीएसटी कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेती आणि पशुपालन क्षेत्रातल्या सहकारी संस्थांना याचा लाभ होईल, तसंच शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळेल, असंही सरकारचं म्हणणं आहे.
वस्तू आणि सेवा कर परिषदेनं जीएसटीच्या दरांमध्ये केलेली कपात येत्या २२ तारखेपासून लागू होणार आहे. यामुळं दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवरचा कर कमी होणार आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून…
(विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधनं, केसांला लावायचं तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश या वस्तूंवरचा जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर येईल. दात घासायच्या पावडरवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के होईल. कंगवे, केसांसाठी लागणारं साहित्य इत्यादींवरचा १२ टक्के जीएसटी आता ५ टक्के इतका कमी केला आहे. दाढी करण्याचं सामान आणि साबणावर आता १८ टक्क्यांच्या ऐवजी ५ टक्के जीएसटी द्यावा लागेल. रबरबँड्स, विविध पद्धतीचं चामडं, हाताने तयार केलेल्या वस्तू, पिशव्यांवर लागणारा १२ टक्के जीएसटी ५ टक्के होईल. पेन्सिली, रंगीत खडू, जलरंग, खडू इत्यादी साहित्यावर यापुढे कोणताही जीएसटी द्यावा लागणार नाही.)