नववर्षाचं स्वागत देशभरासह राज्यात आनंदात आणि उत्साहात झालं. राजधानी दिल्लीसह देशाच्या इतर भागातही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक एकत्र आले होते.
मुंबईत गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं. नव्या वर्षाच्या पहाटे आज मुंबईत पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला. राज्यातल्या विविध भागातही नागरिकांनी नववर्षाचं स्वागत केलं. नंदुरबारमधे श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार करून नवीन वर्षाचं स्वागत केलं.
गोंदियामधे नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं केली. नागरा धाम मंदिरातील पंचमुखी शिवलिंगाच्या दर्शनासाठी तसंच सिव्हिल लाईन भागातल्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांची मोठी रांग लागली होती.
गोवा, मध्य प्रदेश, तेलंगणामध्ये स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. अमृतसरमध्ये श्री हरमंदिर साहिबमध्ये नव्या वर्षाचं स्वागत प्रार्थनेनं झालं.
काश्मीर खोऱ्यात काल नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात झालं. गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि इतर पर्यटन स्थळांवर तसंच श्रीनगरमध्ये लाल चौक इथल्या ऐतिहासिक क्लॉक टॉवरजवळही नागरिकांनी एकत्र येऊन नववर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं. यावेळी शहरात, प्रमुख रस्त्यांवर आणि पर्यटन स्थळांवर बहू-स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.