कामगारांसाठीचे ४ नवीन कायदे आजपासून लागू झाल्याची घोषणा केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केली.
वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२०, आणि ऑक्युपेशनल सुरक्षितता, आरोग्य आणि वर्किंग कंडीशन्स संहिता २०२० हे नवीन कायदे कामगारांच्या हिताचं रक्षण करुन त्यांच्याविषयीचा आदर वाढवतील. जुन्या कायद्यांमधल्या तरतुदी कालबाह्य झाल्या असून नवीन कायद्यांमुळे कामगारांना सरस वेतन, विमा सुरक्षा आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल, असं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले.
या कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे वेळेवर किमान वेतन, नियुक्तीपत्र, महिलांना समान वेतन, ४० कोटी कामगारांना विमा संरक्षण, तसंच निश्चित कालावधीसाठी कामावर ठेवलेल्यांना वर्षभरानंतर ग्रॅच्युईटीचा लाभ मिळेल. ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या कामगारांना वार्षिक आरोग्य तपासण्या मोफत करता येतील. ओव्हटाईमसाठी दुप्पट वेतन तसंच धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या कामगारांना आरोग्य विमा मिळण्याची तरतूद या कायद्यांमधे आहे.